या झोपडीत माझ्या आम्ही मांडवी येथे बसमधून उतरलो. माझ्यासोबत माझे सर डॉ. कालिदास देशपांडे आणि जोसेफ हा त्यांचा पी.एच.डी.चा एक विद्यार्थी. सकाळीच चहा घेवून किनवटहून आम्ही बसने निघालो होतो. अतिशय त्रासदायक प्रवास करूनहि सर उत्साहात होते. डोंगराळ प्रदेश, जंगल, रस्त्यांचा अभाव यामुळे हा परिसर म्हणजे नांदेड जिल्ह्याचे ‘ काळे पाणी’ मानले जाई. आजही एखाद्या कर्मचाऱ्याला शिक्षा म्हणून ‘किनवट – मांडवी’ दाखवण्याची धमकी दिली जाते. त्याकाळी तर तो भाग अतिशय दुर्गम होता. ग्रामीण, दुर्गम भागातील शिक्षण हा आधीच माझ्या वडिलांच्या जिव्हाळ्याचा विषय. अधिकाऱ्यांशी संपर्क, सत्तेशी जवळीक, प्रसिद्धी इ. गोष्टी सहज शक्य असूनही त्यांनी आयुष्यभर कटाक्षाने टाळल्या. परिणामी किनवट, मांडवी, गडचिरोली, अहेरी अशा आदिवासी भागात काम करण्याचे प्रसंग त्यांच्यावर नेहमीच आले. आणि ते याला इष्टापत्तीच मानत. याचमुळे क्लास टू मुख्याध्यापक म्हणून प्रमोशनवर मांडवी येथे बदली होताच ते आनंदाने त्वरित र...