या झोपडीत माझ्या
आम्ही मांडवी येथे बसमधून उतरलो. माझ्यासोबत माझे सर डॉ. कालिदास
देशपांडे आणि जोसेफ हा त्यांचा
पी.एच.डी.चा एक विद्यार्थी. सकाळीच चहा घेवून किनवटहून आम्ही बसने निघालो होतो. अतिशय
त्रासदायक प्रवास करूनहि सर उत्साहात होते.
डोंगराळ प्रदेश, जंगल, रस्त्यांचा अभाव यामुळे हा परिसर
म्हणजे नांदेड जिल्ह्याचे ‘ काळे पाणी’ मानले जाई. आजही एखाद्या कर्मचाऱ्याला
शिक्षा म्हणून ‘किनवट – मांडवी’ दाखवण्याची धमकी दिली जाते. त्याकाळी तर तो भाग अतिशय
दुर्गम होता. ग्रामीण, दुर्गम भागातील शिक्षण हा आधीच माझ्या वडिलांच्या
जिव्हाळ्याचा विषय. अधिकाऱ्यांशी संपर्क, सत्तेशी जवळीक, प्रसिद्धी इ. गोष्टी सहज
शक्य असूनही त्यांनी आयुष्यभर कटाक्षाने टाळल्या. परिणामी किनवट, मांडवी,
गडचिरोली, अहेरी अशा आदिवासी भागात काम करण्याचे प्रसंग त्यांच्यावर नेहमीच आले. आणि
ते याला इष्टापत्तीच मानत. याचमुळे क्लास टू मुख्याध्यापक म्हणून प्रमोशनवर मांडवी
येथे बदली होताच ते आनंदाने त्वरित रुजू झाले. मांडवीच्या हायस्कूलची पार दुर्दशा
झालेली. कुणालाही, त्या गावालाही, याची खंत नव्हती. नेहमीप्रमाणे सर्वस्वी प्रतिकूल
परिस्थितीत कुठलाही गाजावाजा न करता बाबा कामाला लागले. कधी नांदेडला घरी आले,
म्हणजे शाळेत होत असलेले बदल, त्यातील अडचणी, आव्हाने, संकटे यांचे किस्से आम्हाला
कळत. स्वतःच्या कामाची बढाई म्हणून नव्हे, तर ‘ मांडवीच्या गंमती’ म्हणून.
मग बाबांनी सरांना मांडवीला बोलावण्याचे ठरवले. बाबांचे
स्वातंत्र्यसैनिक म्हणून कार्य, ध्येयवादी वृत्ती, हे सर्व सरांना माहित होते.
त्यामुळे त्यांना बाबांबद्दल आदर होता. पण संशोधन, देश परदेशातील परिषदा, सामजिक उपक्रम
यात सर सदैव व्यस्त. त्यांना एवढ्या दुर्गम ठिकाणी, एका जि. प. हायस्कूल मध्ये
न्यायचे ? त्यावेळी मांडवीला जावून येण्यास किमान तीन दिवस लागत. जाता येता वाटेत
किनवटला मुक्काम करावा लागे. पण बाबांचा आग्रह कायम होता.
आश्चर्य
म्हणजे क्षणाचाही विचार न करता सरांनी होकार दिला. त्यानुसारच आम्ही मांडवीला आलो
होतो. बाबांनी आमच्या स्वागतासाठी पाठवलेल्या गुरुजींसोबत आम्ही पायी शाळेकडे
निघालो. त्यावेळी मांडवी म्हणजे खेडे आणि तांडा यांचे मिश्रण असणारी वस्ती होती.
सगळीकडे दारिद्र्य, अस्वच्छता, शिक्षण आणि विकासाबद्दल अनास्थेचे उदासवाणे दर्शन. आम्ही
शाळेच्या जवळ येताच सोबतच्या गुरुजींनी डावीकडे आमचे लक्ष वेधले.
“हे साहेबांचं घर.”
प्रथम तर
माझ्या लक्षातच आले नाही. “म्हणजे ?”
“तुमच्या
वडिलांचं घर. इथंच राहतात ते ! ”
गेटच्या जवळच पण शाळेच्या कंपाउंडच्या बाहेर मोकळ्या जागेत एक
झोपडी होती. अगदी चित्रातल्यासारखी. आजूबाजूला अर्धवट वाळल्या गवताने भरलेले मोकळे मैदान. आणि मध्ये तुराट्या आणि तट्टे यांनी बनवलेली आयताकृती झोपडी. वर
छप्परही तुराट्याचे. दृश्य म्हणून ते खूप सुंदर असेल. पण त्या क्षणी माझ्यासाठी
बाबांचे घर म्हणून ती झोपडी मला अगदी अनपेक्षित होती ! तिच्याकडे पाहताच सर्रकन
अंगावर काटा आला.
“ Oh ! A hut ! looks really like a
drawing ! ” जोसेफला मराठी येत नव्हते. तो इंग्रजीत म्हणाला. “तुमच्या
वडिलांची झोपडी ? मी आत जाऊन पाहू ? ”
बाबांची झोपडी पाहून बसलेल्या मानसिक धक्क्यातून मी चटकन
सावरलो नव्हतो. आम्ही आत गेलो. आत सारवलेली जमीन. एका बाजूला लोखंडी पेटी. त्यात
कपडे आणि कागदपत्रे असणार. एका बाजूला एक लाकडी संदुक. त्यावर मीठ तिखट, तांदूळ,
पीठ असे आईने दिलेले काही डब्बे. एका कोपऱ्यात काठी. एक वातीचा स्टो. रॉकेलची
बाटली. एक कंदील आणि एक दिवा. घोंगडीची वळकटी. बस एवढेच ! आतले दृश्य पाहताच माझे
मन एकदम गलबलून गेले.
“ आत तर
काहीच नाही ! मला झोपडीच्या आत काय असते याचे फार कुतूहल होते.” जोसेफच्या या
उद्गारावर मी काहीच बोलू शकलो नाही.
त्याक्षणी तरी अभिमानापेक्षा विषाद तीव्र होता. एकदम आठवलं ! आपण झोपडीत
रहात असल्याचा उल्लेख बाबांनी एकदोनदा केला होता. पण मी तरी त्याकडे फारसे लक्ष
दिले नव्हते. बाबांनीही फारसे वर्णन केले नव्हते. “ या एकदा आमची गरीबाची झोपडी
पहायला ! “ असेही ते म्हणाले होते. आम्हाला ते गंमतीचे बोलणे वाटले होते. नांदेडला
भाग्यनगरच्या आमच्या प्रशस्त घरात आम्ही सारे मजेत रहात होतो. खात पीत होतो. आणि या सर्व
ऐश्वर्याचा स्वामी मात्र इथे दूर झोपडीत कंदीलाच्या अंधुक उजेडात झोपत होता. कधी
तांदूळ उकडून, तर कधी तिखटमीठ लावून पोहे खात होता. विशेष म्हणजे त्याला त्याची मुळीच खंत नव्हती. आईला
बाबांच्या या अशा बेभान स्वभावाची कल्पना होती. म्हणूनच ती सतत काळजी करत होती. ‘ एकदा
मांडवीला जाऊनच येते ’ असे म्हणत होती. आणि मी मात्र “ तू उगीच काळजी करतेस ‘ असे
म्हणून तिच्यावर चिडत होतो. खरे तर बाबा झोपडीत रहात होते, म्हणजे काही संकटात
होते असे नाही. पण आमचे नांदेडचे राहणीमान आठवून मला एकदम अपराध्यासारखे वाटू
लागले.
तसे हे काही फार अनपेक्षितही नव्हते. बाबा तसे जीवनवादी असले
तरी त्यांच्या दैनंदिन आचरणाला विरक्तीची एक झालर असे. उदा. पंचपक्वन्नापेक्षा
त्यांना भाकरी भाजी आवडे. ते कधीही गादीवर झोपत नसत. अंथरायला एक घोंगडी घेत. पुढे
आजारपणात आम्ही आग्रहाने त्यांना जमीन किंवा बाजेऐवजी पलंगावर झोपणे सक्तीचे केले,
तेव्हाही ते पलंगावर घोंगडी अंथरून झोपू लागले. पण इतरांनी सुखसोयी उपभोगण्यास
त्यांची हरकत नसे. किंबहुना ते त्यासाठी पुढाकार घेत. मिठाया आणून वाटत ,पण स्वतः फक्त
कणभर घेत. नुकतीच आम्हा सर्वांसाठी गाद्यागिरद्यांची सोय करून ते मांडवीला आले होते.
त्या पार्श्वभूमीवरच त्यांची ही झोपडी व तिथले जीवन पाहून मनोमन मला अपराधी वाटू लागले.
तिथून आम्ही शाळेत गेलो. कार्यक्रम, सरांचे मंत्रमुग्ध
करणारे व्याख्यान, सर्व अगदी छान झाले. सरांनी पूर्ण शाळा फिरून पहिली.
विद्यार्थ्यात मिसळले. शिक्षकांशी स्वतंत्रपणे बोलले. बाबांचे कार्य, सुधारणा, भावी योजना सर्व त्यांनी समजावून
घेतले. झोपडी या विषयावर मात्र बाबा फारसे बोललेच नाहीत. त्यांच्या मते शाळा व
तिच्यातील बदल हे महत्वाचे विषय होते. त्यांचे व्यक्तिगत जीवन, त्रास वगैरे गौण बाबी होत्या. नंतर
आम्ही तिघे नांदेडला परतलो.
पुढे बऱ्याच बाबी कळल्या. गावात माजी खासदार उत्तमराव राठोड
यांच्या वाड्याशिवाय दोनच पक्क्या इमारती होत्या. एक शाळा आणि दुसरी बँक. उत्तमराव
राठोड यांचा आणि बाबांचा पूर्वीचा परिचय होता. ते बाबाना आदराने वागवत असत. सध्या
ते नसले तरी वाड्यातील एखाद्या खोलीत बाबांनी राहावे असे वाड्यातून सुचवण्यात आले
होते. पण बाबांनी नम्रपणे नकार दिला.
मांडवीच्या शाळेचा
अनेक बाबतीत दुर्लौकिक होता. मुलांची तसेच शिक्षकांची उपस्थिती, शिस्त वगैरे
प्रश्न तर बाबा सहज मार्गी लावत. पण काही अधिक गंभीर समस्या होत्या. सायंकाळी
दारुडे, जुगारी यांना शाळेत रान मोकळे होई. रात्री तर अनेक दुर्व्यवहारासाठी ती
इमारत वापरली जाते असा प्रवाद होता. पण हेडमास्तरने शाळेच्या गेटसमोर झोपडी बांधून
राहण्याच्या एका कृतीने हे सर्व प्रश्नच निकाली निघाले. बाबांच्या मते मात्र यात
त्याग वगैरे काही नव्हतेच. अनेक गंभीर
समस्यांवरचा तो एकच रामबाण उपाय होता.
पुढेही बाबा वर्ष दीडवर्ष मांडवीला
राहिले. त्यांनी शाळेचा केलेला कायापालट, गावकरी, शिक्षक, सेवक, विद्यार्थी
यांच्या भूमिकेत झालेले बदल हा सर्व वेगळ्या लेखाचा विषय आहे. पण बदली होईपर्यंत
बाबा त्याच झोपडीत राहिले. आईही दोन महिने त्या झोपडीत राहून आली. आपण झोपडीत
राहतो म्हणजे काही त्याग करतो हे तर त्यांनी मानले नाहीच. पण झोपडीत राहणे
कमीपणाचे, केविलवाणे असेही कधी मानले नाही. त्यांचे बालपण कल्पनातीत दारिद्र्यात
गेले. तरीही ते आयुष्यभर आनंदी, व्यस्त आणि ताठ मानेने जगले. त्या झोपडीतही ते तसेच
ऐटीत, रुबाबानेच राहिले. शिक्षण ही खरोखरच त्यांची देशसेवा होती. देशभक्त हा
दयनीय, गरीब, केविलवाणा असावा हे त्यांना तत्वतःच मान्य नव्हते. त्यांच्यासाठी
महाल, झोपडी, तुरुंग हे सर्व सारखेच होते.
पण मांडवीची ती झोपडी ही माझे वडील केशवराव कुलकर्णी काटकळंबेकर यांचा ध्येयवाद, निर्भयता,
कार्यनिष्ठा आणि नैतिक दरारा यांचे प्रतिक बनली होती. आता ती तिथे आहे की नाही हे
माहित नाही. पण माझ्या मनात मात्र ती कायम ठसली आहे.
( झोपडीचे छायाचित्र : इंटरनेटवरून )
( झोपडीचे छायाचित्र : इंटरनेटवरून )

अप्रतिम
ReplyDeleteफार छान!
ReplyDeleteखूप छान आठवण तुमच्या शब्दांमधून बघता आली.. एका श्रीमंत कर्मवेड्या ची झोपडी.. त्यांचा वारसा तुमचे शब्द जपात आहेत.
ReplyDelete