स्पर्श
स्पर्श
´थोडं थांबा ना ! दूध घेवून जा ! आत्ता देते.” आई बाबुगुरूंना म्हणाली. बाबा अजून देवघरातच होते.
“ बरं. थांबतो. !” बाबुगुरू एवढंच
म्हणाले आणि बैठकीतल्या खुर्चीवर बसले.
तसेही अघळ पघळ गप्पा मारताना मी
त्यांना कधी पाहिलेच नव्हते. साधे, फारतर रंगीत काठाचे धोतर आणि नेहरू शर्ट हा
साधा पोशाख, आणि स्वतःबद्दल कमीतकमी बोलणे. हे पाणी उथळ नव्हते, तर वरून ज्याची
कल्पना येणार नाही असा हा एक खोल समुद्र होता. बाबुगुरू आपस्तंब हे खरेखुरे
विद्वान, ज्ञानी म्हणून पंचक्रोशीत प्रसिध्द होते. पण आपली विद्वत्ता आणि व्यासंग
याचा त्यांना मुळीच गर्व नव्हता. उलट त्यांच्या साध्या राहणीमुळे त्यांच्या तपःपूत
व्यक्तिमत्वाला एक लोभस परिमाण मिळाले होते. माझ्या बाबांना त्यांच्याबद्दल फार
आदर होता. कडक शिस्त, वक्तशीरपणा आणि निःस्पृहता या त्यांच्या गुणांमुळे त्यांच्याबद्दल
एक प्रकारचा दरारा आणि त्याचवेळी एक कुतूहलयुक्त जिव्हाळा मला वाटे. त्यामुळे पूजा
सांगण्यासाठी ते घरी आले की मी त्यांच्या नकळत त्यांचे निरीक्षण करत राही.
आत्ताही ते नेहमीसारखेच शांतपणे
बसले होते. त्यात घाई, काळजीचा लवलेशही नव्हता. प्रगाढ शांतिसोबत त्यांच्या मुखावर
मला सदैव एक विलक्षण संतुष्ट, तृप्त असा भाव दिसत असे. त्यांच्या या समाधानी
वृत्तीचेच मला फार आकर्षण होते. हे समाधान म्हणजे कमी क्षमतेच्या व्यक्तीने
अगतिकपणे स्वीकारलेली अल्पसंतुष्टता नव्हती. तर जणू सारे काही मिळवून, भोतिक
समृद्धीतील अर्थ आणि वैय्यर्थ जाणून मग आलेली ती तृप्ती, शांति होती.
हातात एक पुस्तक घेवून मी
नजरेच्या कोपऱ्यातून पाहत होतो. चंद्रकलाने दुधाचे फुलपात्र आणून त्यांच्या हातात दिले.
किंचित स्मितयुक्त नजरेने तिच्याकडे पाहत त्यांनी ते फुलपात्र समोर स्टुलावर
ठेवण्यास खुणावले. दूध थोडे थंड होण्याची ते वाट पाहत असावेत. पण थोडा वेळ जावूनही
त्यांनी त्यास हातही लावला नाही, तेव्हा माझे लक्ष गेले. बाबुगुरुंनी डोळे मिटून
घेतले होते. त्यांचे लक्ष समोर कुठेच नव्हते. एकदम स्तब्ध.
मी गोंधळलो. काय झाले असावे ? त्यांनी डोळे का
मिटून घेतले ? काही त्रास ? अचानक एखादी व्याकूळ आठवण ? पण कशामुळे ?
आणि मग एकदम माझ्या लक्षात आले.
गणेशोत्सवाचे दिवस होते. आणि आमच्या घरासमोरच्या मंदिरात मोठ्या आवाजात एक भजन सुरु झाले होते.
थोड्या वरच्या पट्टीतले अनुप जलोटाचे स्वर आसमंतात गुंजत होते.
“ इतना तो करना स्वामी ...जब
प्राण तनसे निकले.”
बाबुगुरुंचे पूर्ण लक्ष त्या
गाण्यात होते. मीही एकेक शब्द लक्ष देवून ऐकू लागलो. हे भजन मी पूर्वी ऐकलेले
होते. पण आता त्यातील शब्द मनाचा ठाव घेवू लागले.
अगदी हातात खड्ग घेवून मृत्यु
काही पुढे उभा नाही. शेवटची इच्छाही कुणी विचारली नाही. पण आयुष्याच्या
तिन्हीसांजा झाल्या आहेत. अनिश्चिततेच्या सावल्या क्षितीजावर रेंगाळू लागल्या
होत्या. केव्हाही काहीही घडू शकेल याची जाणीव झाली आहे. अशाच एका तृप्त, अनासक्त,
परिपक्व जीवाची ही आर्त मागणी होती.
....इतना तो करना स्वामी, जब
प्राण तनसे निकले....
संथ शांत जलाशयावर हळुवार लाटा
उठाव्यात तशी या गाण्याची लय. मागणं तर आहे. पण तसं स्वतःसाठी म्हणून काही नाही.
आता जीवनातील असंख्य सुखदुःख पाहून, भोगून झाल्यावर मागायचं असं काही शिल्लकच नाही. जे जे, जसे जसे दिले
आयुष्याने ते पुरे आहे. काही देणे नाही, काही येणे नाही. बस ! आता एकच अपेक्षा आहे
– तो शेवटचा क्षण मनासारखा असावा.
श्री गंगाजीका तट हो, यमुनाका
वंशवट हो
मेरा सांवला निकट हो, जब प्राण
तनसे निकले.
बाबुगुरूंचा चेहरा भावनेने
ओथंबलेंला. तो बघताना एकदम जाणवले. अरे ! हे केवळ गाणे नाही. पूजा समजून पूर्ण
केलेल्या जीवनाला कृष्णार्पण करतांना वहावयाच्या तुळशीपत्रासारखा तो अंतिम
क्षण....कुठे... कसा यावा... याचे हे केवळ काव्यमय वर्णन नाही.. तर ती एक आर्त
उत्कट साद आहे ...आणि म्हणूनच थोड्या
वरच्या पट्टीत आहे.
पितांबरी कसी हो, छवी मनमे ये बसी
हो
होटों पे कुछ हसीं हो, जाब प्राण
तनसे निकले
आतल्या खोलीतून बाहेर येवून
चंद्रकला अंगणात गेली. बाबुगुरुंचे लक्षच नव्हते. त्यांचे जणू देहभान हरपले होते.
मी आश्चर्याने थक्क झालो. ही जादू नेमकी कशाची होती ? या प्रशांत महासागराला ढवळून
टाकण्याचे सामर्थ्य होते कशामध्ये ? शब्दांत
? की सुरांत ? की हा भावनेचा खेळ होता ?
उस वक्त जल्दी आना, नही शाम भूल
जाना
राधा को साथ लाना, जब प्राण तनसे
निकले.
बघता बघता आश्चर्य झाले.
बाबुगुरूच्या मिटल्या डोळ्यावर अश्रुंचे थेंब दाटून आले. आणि काही क्षणातच दोन्ही
डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. ते अश्रू दुःखाचे तर नव्हतेच. परिपूर्ण आणि
सुंदर कलाकृतीने संवेदनशील हृदयाला फोडलेला पाझर होता तो. दिव्य संगीताच्या
स्पर्शाने कशी जादू होते, अश्रू कसे दाटून येतात, हे मी स्वतः अनुभवले होते.
जिवाशिवाचे नाते जोडील –किमया
सप्तसुरांची.
पाषाणाला पाझर फोडील –किमया सप्तसुरांची.
या ओळी तशा माझ्या आवडत्या. पण
त्यांचा असा प्रत्यय मी स्वप्नातही कल्पिला नव्हता.
आत्ता मला आठवले की बाबुगुरू
संगीताचे जाणकार रसिक होते असे मी ऐकले होते. कदाचित हे भजन त्यांनी प्रथमच ऐकले
असावे. सुरांच्या अद्भुत सामर्थ्यामुळे भजनाच्या शब्दांतील आर्त भाव अगदी अचूकपणे
त्यांच्या हृदयात पोहोचले होते. आणि सहसंवेदनेने जणू त्यांच्या आत्म्याला स्पर्श
केला होता.
काही क्षणानंतर भजनाचे सूर विरत
गेले. शेवटच्या स्वरावर रेंगाळलेली स्पंदने आसमंतात थरथरत राहिली. थोडा वेळ शांत
राहून मग गुरुजींनी डोळे उघडले. समोरच्या फुलपात्रातील दुध निमुटपणे पिवून टाकले
आणि कुणाशीही काहीही न बोलता ते हळू हळू चालत निघून गेले. नेहमीसारखे.
पण फरक माझ्यात पडला होता.
हिमालयातील बर्फ सूर्यकिरणांच्या
स्पर्शाने वितळतो, हे मी भूगोलात शिकवत आलो. पण एका हिमशिखराला सुरांनी स्पर्श
केल्यामुळे तो कसा वितळला .... आणि त्या शिखरातून पवित्र गंगेची धारा कशी प्रवाहित झाली, याचा साक्षीदार होण्याचे
भाग्य मला लाभले होते.

Khup chhan sir.
ReplyDeleteछान.
ReplyDelete