ताऱ्यांच्या सावलीत
        वेळ संध्याकाळची होती. मी, राजीव देशपांडे,बालन गोरे आणि भानुदास पेंडकर, मनाने एकमेकांच्या अगदी जवळ असणारे आम्ही तिघे मित्र निवांत फिरत त्या रम्य रस्त्यावरून जात होतो. त्या सायंकाळी शिमल्याचा मन गुंगवून ठेवणाऱ्या मालरोडवर जणू नंदनवन अवतरले होते. आकर्षक रंगाच्या लोकरी कपड्यातली गोजिरी मुले. नटून शॉपिंगला निघालेली जोडपी, अनोळखी सेंटचे सुगंधी झोत...अज्ञात भाषेत किलबिलाट आणि कलकलाट करणाऱ्या विक्रेत्या मुली आणि मुले... आम्ही तिघे कुठल्याश्या विषयावर बोलत एकाच दिशेने लांब चालत जात होतो. घाई कुठलीच नव्हती. हळूहळू भोवतालची वर्दळ कमी होत गेली. आमच्या उजव्या हाताला त्या रुंद रस्त्याला लगटून कडा होता. त्या कड्यापलिकडे दूरपर्यंत देवदाराची जंगले दिसत होती. त्या जंगलावर काळसर तांबूस सावल्या उतरत होत्या.
       अंधार पडू लागला. भिरभिरत थंडगार वारा वाहू लागला. त्या वाऱ्यासोबत एक किंचित उग्र पण हवासा अज्ञात सुगंध. मला असे सारखे वाटत होते, की हा सुगंध त्या देवदारच्या जंगलदऱ्यातला आहे. हळूहळू आकाशात चांदण्या चमकू लागल्या.
     आम्ही बोलत बोलत चालतच होतो. वारा अधिक जाणवू लागला. त्यासोबत थंडीही. अंधार दाट झाला. डोक्यावर असंख्य चांदण्या लखलखू लागल्या. एवढा वेळ सरळ एकाच दिशेने जाणारा तो स्वच्छ काळा डांबरी रस्ता उंच कड्याच्या काठावरून एकदम डावीकडे वळला. त्या वळणावरच्या एका सिमेंटच्या बाकावर आम्ही सहज विसावलो.
भानू सहजच मागे वळला. आणि आश्चर्याने ओरडला .” अरे बापरे ! हे बघा ! ”
मी आणि बालन, आम्ही दोघांनीही वळून पहिले आणि अक्षरशः स्तिमित होवून बघतच राहिलो.
वळणावरल्या ज्या बाकावर आम्ही बसलो होतो, त्याच्या मागे खोल काळा कडा आणि त्या कड्याच्या पायथ्याशी दूरवर पसरला होता – चमचमत्या दिव्यांचा अथांग दर्या. हे होते : शिमला शहराचे रात्रीचे विहंगम दर्शन. सहजच आमच्या वाट्याला आलेले.
वर आकाशात असंख्य तारे चमचमत होते. चहुबाजूला गुडूप अंधार आणि निरव शांतता. आम्ही चालत आलो तो डांबरी रस्ता दूरवरून चांदण्यात चकाकत आमच्याकडे येत होता. आणि आम्ही बसलो तिथेच वळण घेवून सरसरत कड्याखाली गेला होता. अज्ञात अंधारातली गूढ वळणे घेत खोल दूर जाणारा तो रस्ता एखाद्या नदीसारखा जावून मिळाला होता – त्या दिव्यांच्या समुद्राला.  
शब्दाच्या स्पर्शाने जणू त्या दृश्यातील जादू संपून जाईल म्हणून की काय, शब्दही न उच्चारता कितीतरी वेळ आम्ही तिघेही त्या दृश्याकडे पाहत बसलो. त्या भारलेल्या अवस्थेत आम्ही तिघे जे काही मोजके बोललो, ते जणू मनावर कोरले गेले.
एक अप्रतिम दृश्य आपण पाहत आहोत पण भोवताली ते नेहमीचे क्षुद्र जग नाही ही जाणीवच फार सुखद होती. एरवी सिनेमात पडद्यावर आणि बस, रेल्वे मधे खिडकीतून सुंदर निसर्गदृश्ये दिसतात. पण त्यावेळी भोवतालचे पार्थिव जग आणि वास्तव आपल्याला उच्च पातळीवर जाउच देत नाही. पायाला लागणाऱ्या कॅरीबॅग, एअर फ्रेशनर ,सिगारेट, अत्तरे, पॉपकॉर्न,घाम यांचे मिश्रण असणारा उग्र दर्प, आजूबाजूच्या खुर्च्यावरील महान हौशी प्रेक्षकांचे, प्रवाशांचे तेवढेच महान चाळे आणि कॉमेंट्स .... दिसणाऱ्या दृश्याची सारी जादूच वितळून जाते. आणि उंच झेपावू पाहणारे मन कसे झटक्यात खाली येते. मग कधीतरी मनाने ठरवून टाकले – दिव्य भव्य, सुंदर... या फक्त कल्पना. प्रत्यक्षात तसे काही शुद्ध स्वरुपात नसतेच. निदान तो अनुभव आपल्या नशिबी नाही. आपल्यासाठी सौंदर्य हे नकोशा वास्तवतेच्या स्पर्शाने कायम कळंकलेलेच राहणार.
          पण यावेळी मात्र जिवंत, साक्षात अनुभव होता. सोबत मनाच्या तारा जुळलेले, अभिरुची व  अनुभूतीची हवी तेवढी उंच झेप घेवू शकणारे जिवलग मित्र होते. बाकी निरव शांतता...सुखद चिमटे घेणारा  नैसर्गिक वारा ... आसमंतात भरलेला अज्ञात हवाहवासा गंध..सारा अनुभव एखाद्या स्वप्नासारखा....
   पायथ्याशी दूरदूरपर्यंत पसरलेले असंख्य चमचमणारे दिवे – एवढीच मानवी अस्तित्वाची – शिमला शहराची चाहूल होती. जे नको ते खूप दूर कुठेतरी होते. माणसे आली की स्वार्थ, बाजार , हीन इच्छा, सिगरेटचा वास , अनेकदा भेसूर होणारी दारूड्यांची बेताल बडबड,, मिरच्यांचा ठसका ..हे सारे आलेच. शहर म्हटले की देखण्या इमारती, हॉटेल्स सोबत गटारे, सिनेमाचे बीभत्स पोस्टर्स, खुनशी चेहरे, तुडुंब गर्दी, गुन्हेगारांच्या अस्तित्वखुणा हे सारे आलेच. सुखाच्या चांदण्यात फिरताना अशा असंख्य  नकोशा सावल्या भोवताली रेंगाळतच असतात. पण कधी कधी उदात्ततेकडे झेपावू बघणाऱ्या मनाला तीव्रतेने नकोसे वाटतात - अस्तिवाला अविरत व्यापून टाकणारे, मनाने अगतिकतेने स्वीकारलेले हे शापित काजळपाश.
त्या सायंकाळी मात्र सारेच जुळून आलेले. आम्हाला तिथून शिमला शहर दिसत होते ते फक्त त्या चमचमत्या दिव्यांच्या विस्तृत राशींच्या स्वरुपात. त्याला चिकटलेल्या नकोशा गोष्टी – कर्कश्श गाणी, पडक्या इमारती, अतोनात रंगवलेले चेहरे ....काहीच दिसत नव्हते. अवघ्या शहराचे आणि माणसाचे प्रतिनिधी म्हणून होते, ते लक्ष लक्ष दिवे.
           ते दिवे फारच दिव्य वाटू लागले. ते साधे रस्त्यावरचे दिवे किंवा मर्क्युरी लॅंप नव्हते की ज्याला कुणी एक साधा माणूस चालू बंद करू शकेल. ते कुण्या हॉटेलमधले रात्री रंगवणारे रंगीत दिवे नव्हते किंवा गरीब घराचा पंचवीस पॉवरच बल्ब नव्हता. आम्ही एवढे दूर एवढे उंच होतो - की दिसत नव्हते ते दिवे  लावणारे राकट हात, दिवे विझवणारे स्वार्थी, लंपट हात... दिव्याखालचे लटपटणारे पाय...अलिशान इमारतींचे ऐश्वर्य, दरिद्री घरांच्या पडक्या भिंती, विटलेले रंग ...उन्मत्त क्रूर चेहरे आणि लाचार, विषण्ण चेहरे ..सारे काही हरवले होते गुडूप अंधारात. नको ते, वाईट तेवढे, उदास तेवढे हरवून , दिसत होती फक्त मानवी कृतीतून फुलून आलेली तेजाची लीला – आकाशाशी , विश्वाशी नाते सांगणारी .   
          देखण्या, अतिभव्य निसर्गापुढे मानवी अस्तित्व हे बुडबुड्याएवढे यत्किंचित आहे. पण काळोखाच्या अथांग सागरावर मैलोगणती पसरलेले असे प्रकाशाचे असंख्य बुडबुडे हेही मानवाच्याच अस्तित्वाची, कर्तृत्वाची साक्ष आहेत. आपणच निर्माण केलेल्या मानवाला रात्री लक्ष तारकांच्या रुपात निसर्ग रोज आशीर्वाद देतो. आणि त्या प्रकाशमय आशिर्वादाला त्याच प्रकाशमय भाषेत मानवाने दिलेले कृतज्ञ उत्तर म्हणजे  – दूरवरून दिसणारे लक्ष लक्ष दिवे.
                      बराच वेळ झाला. भारावलेल्या अवस्थेत आम्ही परत निघालो. उताराच्या रस्त्यावरून खाली उतरताना आम्ही खूप कमी बोलत, जणू तरंगत खाली येत होतो. आमचा मुक्काम होता त्या इमारतीच्या दाराजवळच कुणीतरी हासडलेली इरसाल हिंदी शिवी ऐकू आली. मन झटक्यात जमिनीवर टेकले. स्वप्नाच्या जगातून आम्ही वास्तवाच्या धरातलावर आलो होतो. पण आता मला अशावेळी पूर्वी वाटे तसे वाईट वाटले नाही. कारण सौंदर्य, दिव्यत्व या केवळ कल्पना नाहीत , तर त्या वास्तवाचेच एक स्वरूप आहेत हे मी अनुभवले होते. मला कळले होते : आयुष्य खूप सुंदर आणि दिव्य आहे. फक्त त्यासाठी भोवतालच्या दुनियेतल्या काजळकाळ्या सावल्यापासून दूर, उंच आणि ताऱ्यांच्या सावलीत जाता आले पाहिजे – शरीरानेच नव्हे तर मनाने.
( सोबतचे छायाचित्र : शिमला – रात्रीचे विहंगम दर्शन, इंटरनेट वरून )


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

स्पर्श